Thursday, April 7, 2011

सहजच..

म्हणजे हल्ली इन्टरनेट वर जुने दूर-दर्शन वगैरे वरचे कार्यक्रम बघायला मिळायला लागल्या पासून हा विचार मनात येतो. बहुतांशी सगळ्यांनाच पटेल की ते सगळे जुने कार्येक्रम म्हणजे महाभारत, रामायण वगैरे आता आपल्याला किती संथ वाटतात.. तेव्हा सगळे लोक घरी असायचे.. रविवारी सकाळी चहा-पोहे आणि रामायण/महाभारत :) असा कार्येक्रम. आमच्या घरी, आई बहुतेक स्वयंपाक घरात असायची आणि मधून मधून डोकवायची. ताई, मी, आजी-आजोबा बाहेरच्या खोलीत एकाजागी खिळून.. एक तास ह्या मालिका बघायचो. तेव्हा मध्ये जाहिराती पण नव्हत्या. एकाने मारलेला बाण आणि दुसर्याने प्रत्त्युत्तर म्हणून मारलेले बाण हे आपण पाच एक मिनिटे न कंटाळता बघायचो. मालीकांसाठीच नाही, पण बाकी अनेक गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ होता. आता ह्या मालिका बघताना कंटाळा येतो. अरे हे काय चाल्लय.. आपण किती वेळ हे आकाशातले बाण बघत बसणार.. असं न चुकता डोक्यात येतं. मग थोडी मजाच वाटते मला. वेळ बदलली, वेळेचं मूल्य बदललं आणि आपल्या व्याख्याही बदलल्या. लोकं असंही म्हणतात की काळाबरोबर बदलायला हवंच वगैरे वगैरे.
सगळं मान्य आहे मला. बदलत्या काळाला माझ्याकडे लगेच उत्तर नाही. पण नकळत मन त्याच जुन्या काळाकडे धाव घेत. लहानपणी सगळं कसं साधं होतं, मुखवटे नव्हते, खोट हसणं नव्हतं. घाई नव्हती, कसलं दडपण नव्हतं. हे हि खर की तेव्हा या गोष्टींचं महत्व माहिती नव्हतं. पण आता जाणवत. झालेले बदल ठळकपणे दिसतात. म्हणूनच.. जरी परत जाता येत नसलं तरी आठवणीत रमायला काय हरकत आहे ? आपण थोडासा तर वेळ नक्कीच ठेवूया त्यासाठी, जपून.
:)